सोरायसिस वर उपचार सोरायसिसवरील उपचार
सोरायसिसची कारणे
सोरायसिस लक्षणे (Psoriasis Symptoms In Marathi)
सोरायसिस हा त्वचारोग होण्यामागची कारणं आणि त्याचे प्रकार वेगवेगळे असल्यामुळे तुम्हाला त्याची प्राथमिक लक्षणे आधीच माहीत असायला हवी. ज्यामुळे यावर लवकर निदान करणे शक्य होईल. यासाठी जाणून घ्या सोरायसिस लक्षणे
त्वचेला खाज येणे (Itchiness)
सोरायसिसचे लक्षण प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे असू शकते. मात्र साधारणपणे सर्वांनाच या त्वचा विकारा मध्ये त्वचेवर भयंकर खाज येते. एवढंच नाही तर अती खाजवण्यामुळे त्वचेचे पापुद्रे निघतात आणि त्वचेवर सूज दिसू लागते.
कोरडी आणि भेगाळलेली त्वचा (Cracked And Dry Skin)
त्वचेवर नवीन होणाऱ्या त्वचापेशींचा थर जमा झाल्यामुळे त्वचेचं योग्य पोषण होत नाही आणि त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. काही जणांमध्ये त्वचेवर भेगा पडलेल्या दिसू लागतात तर काहींची त्वचा या रोगामध्ये कोरडी झाल्यामुळे तिचे पापुद्रे सुटू लागतात.
स्काल्पमध्ये खाज (Scaly Scalp)
सोरायसिस हा आजार केसांमध्येदेखील होत असल्यामुळे त्यामुळे तुमच्या स्काल्प लालसर होतो. केसांमध्ये लालसर आणि जाडसर चट्टे उठतात, केसांमध्ये कोंड्याप्रमाणे पांढरा पदार्थ तयार होतो. स्काल्प कोरडा झाल्यामुळे केसांचे नुकसान होते, केस भरपूर प्रमाणात गळू लागतात. त्वचेला प्रंचड खाज येते आणि दाह जाणवतो.
त्वचेतून येणाऱ्या वेदना (Skin Pain)
सोरायसिसमध्ये त्वचेला खूप खाज येते ज्यामुळे त्वचेमध्ये दाह निर्माण होतो आणि जळजळ जाणवते. सहाजिकच या दाह आणि वेदनेतून मुक्तता मिळावी असं रोग्याला वाटू लागतं. या त्वचारोगाने गंभीर रूप धारण करू नये यासाठी खाज आल्यावर त्वचा हाताने खाजवू नका. त्यापेक्षा लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
नखे ठिसूळ होतात (Pitted Nails)
जर तुम्हाला नखांचा सोरायसिस झाला तर यामुळे तुमची नखे ठिसूळ होतात. नखांच्या वरील आवरण हे केरॅटिन सेल्समुळे कठीण असते. मात्र या रोगात तुमच्या या नखांच्या पेशींचे नुकसान होते आणि नखे ठिसूळ आणि भेगाळतात. नखांचा आकार, जाडसरपणा आणि रंग नेहमीपेक्षा वेगळा दिसू लागतो. नखं ठिसूळ झाल्याने पटकन तुटतात.
सांधे दुखी (Joint Pain)
सोरायसिस तीव्र झाल्यास त्यामुळे तुम्हाला सोरायटिक आर्थ्राटीसचा त्रास जाणवू शकतो. सोरायटिक आर्थ्राटीसमुळे तुमच्या सांध्यावर वाईट परिणाम होतो. तुमच्या एक अथवा दोन्ही बाजूचे सांधे यामुळे दुखावले जाऊ शकतात. यामुळे हाता-पायाच्या सांध्यामध्ये सूज आणि वेदना होतात. वेदनेची तीव्रता इतकी वाढत जाते की यामुळे तुम्हाला दैनंदिन कामे करणेही कठीण होते.
सोरायसिसची कारणे (Psoriasis Causes In Marathi)
सोरायसिस होण्यामागची कारणे प्रत्येक व्यक्तामागे वेगवेगळी असतात. त्यामुळे सोरायसिस होण्यामागचं नेमकं कारण कुणीच सांगू शकत नाही. मात्र ही काही कारणं आहेत ज्यामुळे सोरायसिस होऊ शकतो.
अनुवंशिकता (Hereditary)
काही संशोधनात असं आढळलं आहे की जर एखाद्याच्या आई-वडीलांना, आजी-आजोबांना अथवा भावंडांना सोरायसिस झाला असेल तर त्या व्यक्तीला सोरायसिस होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत जास्त असतो. यामागे त्यांच्यातील अनुवंशिकता कारणीभूत असू शकते. जरी तुमच्यामध्ये अनुवंशिक गुण असले तरी वातावरणातील बदलामुळेच हे गुणधर्म कार्यान्वित होतात. त्यामुळे जोपर्यंत वातावरणात असे बदल होत नाहीत तो पर्यंत सोरायसिस त्या व्यक्तीमध्ये सहज विकसित होत नाही.
त्वचेवरील जखमा (Injury To The Skin)
जर तुमच्या त्वचेवर कापल्याच्या, ओरखडे उठल्याच्या, कीटकदंशाच्या, एखाद्या इनफेक्शनच्या जखमा असलीत तर अशा स्थितीत सोरायसिस बळावण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे त्वचेवरील अशा गंभीर जखमा हे देखील सोरायसिस होण्यामागचं एक कारण असू शकतं. बऱ्याचदा गंभीर प्रमाणात झालेलं सनबर्नही सोरायसिस होण्यामागचं एक कारण असू शकतं. त्यामुळे जर तुमच्या त्वचेवर अशा जखमा असतील तर त्यावर त्वरीत योग्य ते उपचार करा.
सुर्यप्रकाश (Sunlight)
मानवी शरीराच्या वाढ आणि विकासासाठी योग्य प्रमाणात सुर्यप्रकाश मिळण्याची आवशक्ता असते. कारण सुर्यप्रकाशातून शरीराला व्हिटॅमिन डीचा पूरवठा होत असतो. मात्र नैसर्गिक सुर्यप्रकाश हा प्रमाणातच मिळणं गरजेचं आहे. शिवाय सकाळचे कोवळे ऊनच त्वचेसाठी उपयुक्त असते. त्यानंतरचे प्रखर ऊन त्वचेसाठी उपयुक्त तर ठरत नाही उलट अपायकारक ठरू शकते. अशा प्रखर सुर्यप्रकाशामुळेही सोरायसिस होऊ शकतो, शिवाय ज्यांना आधीच सोरायसिस आहे त्यांच्यासाठी सुर्यप्रकाश हानिकारक ठरू शकतो.
औषधे (Drugs)
काही औषधे आणि स्टिरॉईडच्या वापरामुळेही शरीरात दाह आणि जळजळ निर्माण होते. ज्याचा परिणाम त्वचेवर सोरायसिस होण्यावर होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही घेत असलेल्या औषधांमुळे अथवा स्टिरॉईडमुळे तुम्हाला त्वचेवर गंभीर लक्षणे जाणवू लागली तर अशी औषधे घेणे त्वरीत थांबवा. शिवाय याबाबत डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या.
भावनिक ताणतणाव (Emotional Stress)
सोरायसिस हा आधीच सांगितल्याप्रमाणे तुमच्या प्रतिकार शक्तीशी निगडीत होणारा एक त्वचा रोग आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या भावनिक ताणतणावात असता तेव्हा त्याचा परिणाम नकळत तुमच्या प्रतिकार शक्तीशी येत असतो. काही संधोधनात असं आढळून आलं आहे की मानसिक अथवा भावनिक ताणतणावामुळे गंभीर आजार निर्माण होऊ शकतात. सोरायसिसदेखील तुमच्या भावनिक ताणाचा एक परिणाम असू शकतो.
हॉर्मोनल बदल (Hormonal Changes)
किशोरवयात मुला-मुलींच्या शरीरात अनेक बदल होतात. या काळात होणाऱ्या हॉर्मोनल बदलाचा एक परिणाम म्हणज सोरायसिस असू शकतो. महिलांमध्ये मॅनोपॉजच्या काळातही असेच परिणाम शरीरात दिसू लागतात. काही महिलांमध्ये गरोदरपणात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांमुळे त्वचेवर हा गंभीर त्वचाविकार जाणवतो. कधी कधी ही लक्षणे काही काळापूरती कमी होतात मात्र पुन्हा जेव्हा शरीरात हॉर्मोनल बदल जाणवतात तेव्हा ती पुन्हा दिसू लागतात.
व्यसन (Smoking And Alcohol)
ज्या लोकांना अती धुम्रपान आणि मद्यपानाचे व्यसन असते अशा लोकांमध्ये सोरायसिस होण्याचा धोका जास्त जाणवतो. तुमच्या घरात कुणी सातत्याने धुम्रपान करणारी व्यक्ती असेल तरीही तुम्हाला सोराससिस होऊ शकतो. अशा लोकांना लक्षणे लवकर जाणवत नाहीत शिवाय आजार लवकर पूर्ण बराही होत नाही. यासाठीच जर तुम्हाला अशी व्यसने असतील तर त्यापासून लवकरात लवकर स्वतःला मुक्त करा. कारण सोरायसिस झाल्यावर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच दक्षता घेणं नेहमीच योग्य ठरेल.
सोरायसिसवर उपचार करण्यासाठी कोणते व्हिटॅमिन घ्यावे ?
सोरायसिस हा प्रतिकार शक्तीशी निगडीत आजार आहे. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन ए, सी, इ आणि डी घेणं गरजेचं आहे. वैद्यकीय उपचारांमध्ये या व्हिटॅनिन्सद्वारे तुमच्यावर उपचार केले जातात.





Comments
Post a Comment